इंदापूरात पतसंस्थेच्या महिला अध्यक्षाची सपासप वार करून हत्या; आरोपी थेट पोलीस स्टेशनला
योगेश पांडे/वार्ताहर
इंदापुर – चाकूने सपासप वार करून ३३ वर्षांच्या महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूरमध्ये घडला आहे. सुनिता दादाराव शेंडे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. सुनिता या इंदापूर तालुक्यातील शेंडे वस्ती निमगांव केतकी येथील रहिवासी होत्या. आणखी धक्कादायक बाब म्हणजे सुनिता यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर बबन रासकर असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. ज्ञानेश्वरने सुनिता शेंडे यांची हत्या का केली? याचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. ४ तारखेच्या रात्री ज्ञानेश्वरने निमगाव केतकी सराफवाडी रोडवर सुनिता शेंडे यांची हत्या केली आहे. आरोपी ज्ञानेश्वर रासकर हा इंदापूरच्या सुरवडचा रहिवासी आहे.
सुनिता शेंडे या जानाई लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा होत्या. तर सुनिता शेंडे यांचे पती दादासाहेब शेंडे हे समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. सुनिता शेंडे यांच्या हत्येमागे पतसंस्थेचा एँगल आहे का? याचा तपासही पोलीस करत आहेत.