जळगावात व्ही. डी. पाटील यांच्यासह नऊ जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल 

Spread the love

जळगावात व्ही. डी. पाटील यांच्यासह नऊ जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल 

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव – सीएसआर निधीतून शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी तब्बल ४५ लाख रूपयांत फसवणूक केल्या प्रकरणी राज्याचे माजी माहिती आयुक्त तथा तांत्रिक सल्लागार व्ही. डी. पाटील यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भातील माहिती अशी की, तापी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे केल्या जाणाऱ्या शेततळ्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी माजी राज्य माहिती आयुक्त तथा तांत्रिक सल्लागार व्ही.डी. पाटील व सहकाऱ्यांनी अजय बढे यांना शेततळ्याची कामे मिळवून देतो असे आमिष देऊन ४५ लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. यामुळे बढे यांनी पोलिसात धाव घेतली होती. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात फक्त दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे बढेंना कळवले होते.

या निर्णयाविरुद्ध अजय बढे यांनी जळगाव येथील कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने सर्व पुरावे लक्षात घेऊन व्ही.डी. पाटील, कार्यकारी अभियंता गोकूळ श्रावण महाजन यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्या आदेशाविरुद्ध व्ही. डी. पाटील व इतरांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणी अपर जिल्हा न्यायाधीश न्या.एस.आर.पवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीश पवार यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवून निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील, कार्यकारी अभियंता गोकूळ श्रावण महाजन व सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश रामानंदनगर पोलिसांना दिले आहेत. बढे यांच्यातर्फे अँड. धीरज अशोक पाटील यांनी तर व्ही.डी. पाटील व सहकाऱ्यांच्या वतीने अँड. प्रकाश बी. पाटील यांनी काम पाहिले.

या प्रकरणी अजय बढे यांच्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात माजी राज्य माहिती आयुक्त व तापी महामंडळाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता गोकूळ महाजन, गोल्ड रिव्हर कंपनीचे (मुंबई) सूर्यवीर चौहान, सनदी लेखापाल सुहास भट (मुंबई), व्ही. के. जैन, पवन कोलते, ललित चौधरी, पंकज नेमाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात तापी महामंडळाच्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon