मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जवळ पोत्यांमध्ये भरलेला महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीसांकडून तपास सुरु
योगेश पांडे/वार्ताहर
तळेगाव – महाराष्ट्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे एका महिलेचा मृतदेह दोन गोण्यांमध्ये फेकलेला आढळून आला. मृतदेह आढळून येताच अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. मृत महिलेचे वय ३० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह दोन पोत्यांमध्ये आढळून आला. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शिरगाव फाटा परिसरात साफसफाई करणाऱ्या कामगारांना सोमवारी दुपारी मृतदेह सापडला. त्यानंतर कामगारांनी पोलिसांना माहिती दिली.
महिलेचे वय सुमारे ३० वर्षे आहे. मृतदेह दोन गोण्यांमध्ये भरून एक्स्प्रेस वेजवळील झुडपात फेकून दिला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार महिलेची दोन दिवसांपूर्वी हत्या झाली असावी. कारण मृतदेह सडू लागला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी कोणतेही पुरावे सापडले नाहीत. अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लोकांचीही मदत घेतली जात आहे.