कालीचरण महाराजांवर गुन्हा नोंदवा; मराठा समाजाची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
खुलताबाद – मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी खुलताबाद तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन खुलताबाद पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘कुठलाही समाज असो, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली जातात. मराठा समाज आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून आंदोलने करत आलेला आहे.
मागणी वेगवेगळ्या कालखंडात आंदोलनाद्वारे समाजाने शासनाकडे मांडली आहे. अशातच मूक मोर्चाच्या माध्यमातून १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने ५८ मोर्चे मराठा समाजाने राज्यात काढले.१६ महिन्यांपासून जरांगे पाटील यांनी उपोषणे आणि रॅली, सभांच्या माध्यमातून शासन दरबारी मराठा समाजाची कैफियत कायद्याच्या चौकटीत मांडली आहे. मात्र, समाजाविरोधात काही जणांनी वक्तव्य करण्याचा विडा उचलला असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.