बेकायदेशीररीत्या ३० हजार मोबाईल सिम विकणाऱ्या दोन मोबाईल सिमकार्ड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यासह ८ जणांना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे न घेता केवळ ‘युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (यूपीसी कोड)’च्या माध्यमातून मोबाईल क्रमांक पोर्ट करून सायबर फसवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकांना विकणाऱ्या दोन मोबाईल सिमकार्ड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यासह ८ जणांना मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने वर्षभरात ३० हजार मोबाईल सिम कार्ड बेकायदेशीर पद्धतीने विकल्याची धक्कादायक माहिती या टोळीच्या चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या बेकायदेशीर सिम कार्डाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. महेश महादेव कदम, रोहित कन्हैयालाल यादव, सागर पांडुरंग ठाकूर,राज रविनाथ आर्ड, गुलाबचंद कन्हैया जैस्वार, उस्मान अली मो हेजाबुर रहमान शेख, अब्बुबकर सिद्दिकी युसुफ आणि महेश चंद्रकांत पवार असे अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्यापैकी पाच जण मोबाईल कंपनीचे कर्मचारी असून उर्वरित तिघेजण दुकानदार आहे.
मुंबई सायबर पोलीस ठाण्यात जून महिन्यात एका व्यक्तीने सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली होती,शेअर्स ट्रेडिग फसवणुकीत त्यांची ५१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तक्रारदार यांना सायबर गुन्हेगारांनी ‘एमएसएफएल स्टॉक चार्ट ३३’ या व्हॉटसअप ग्रुपमध्ये ऍड करून शेअर्स ट्रेडींग करण्यासाठी पैसे गुंतवणूक करण्याकरीता त्यांचे ब्रोकरेज कंपनीच्या वर्चुअल पेजवर खाते तयार करून त्यात नफा वर्चुअल जमा होत असल्याचे दाखवून त्यांना विविध बँक खात्यांमध्ये ५१,३६,००० हजार रुपये रक्कम भरण्यास भाग पाडले होते.