कल्याण डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेनेत वाद सुरुच?

Spread the love

कल्याण डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेनेत वाद सुरुच?

कल्याण ग्रामीण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना तडीपारीची नोटीस; महायुतीमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – राज्यात महायुतीचे सरकार आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेनेत अद्यापही वाद मिटलेला नाही. असे चित्र दिसत आहे. कारण कल्याण ग्रामीण मधील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांना बुधवारी मध्यरात्री तडीपारीची नोटीस देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी त्यांना तडीपार करण्याची प्रक्रिया मानपाडा पोलिसांनी पूर्ण करीत त्यांना रायगड जिल्ह्यात सोडण्यासाठी पोलिस संदीप माळीला घेऊन रवाना झाले आहेत. तडीपार होताना संदीप माळी यांनी जे विधान केले आहे त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘मी रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता आहे, घाबरणार नाही .आगरी समाज आणि भाजपच्या लोकांना मी आवाहन करतोय की लोकसभा निवडणुकीत मी युतीधर्म पाळला म्हणून मला हे फळ मिळाले आहे. तुम्ही पण सावध राहा, हे तुमच्यासोबत पण होऊ शकते. तडीपार होताना भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप माळी यांनी असे विधान केले आहे. संदीप माळी यांना तडीपार करण्यात आले असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

तसेच ,लोकसभा निवडणुकीदरम्यान मी महायुतीचे काम केले. महायुतीचे काम केल्यानंतर मला हे फळ मिळाले आहे. माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मी समस्त आगरी समाज आणि भाजपच्या लोकांना आवाहन करतो की ही वेळ आता माझ्यावर आली आहे, तुमच्यावर ही येऊ शकते. कल्याण ग्रामीणमधून मनसेचे उमेदवार राजू पाटील हे माझे मित्र आहेत, त्यांना मी मदत केल्याच्या संशयावरून माझ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे ही चुकीची आहे. मी रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता आहे अजिबात कोणत्याही कारवाईला घाबरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारी कल्याण ग्रामीण मतदार संघात प्रचार सभा घेतली. या सभेनंतर माळी यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे . त्यामुळे ज्या प्रकारे भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे तशी दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्याविरोधात का होत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon