मुंबईमध्ये तीन विमानांत बॉम्ब ठेवण्याची धमकी; दोन विमाने मुंबईत तर न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला दिल्लीत उतरवले
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी सोमवारी पहाटे प्राप्त झाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. घटनेनंतर दोन विमाने मुंबई विमानतळावरच थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली. तर न्यूयॉर्कला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. नियमानुसार विमानांची तपासणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई विमानतळावरील ६ ई १२७५ व ६ ई ५७ या दोन इंडिगो कंपनीच्या विमानात तसेच न्यूयॉर्कला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या एआय ११९ विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे दूरध्वनी विमानतळ प्राधिकरणाला प्राप्त झाले होते. त्याबाबत मुंबई पोलिसांना तसेच संबंधीत यंत्रणांना कळवण्यात आले. या माहितीनंतर तात्काळ बैठक घेऊन ६ ई १२७५ व ६ ई ५७ दोन्ही विमाने मुंबई विमानतळावर थांंबवण्यात आली. तर एअर इंडियाचे विमाना न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघाले होते त्याच्या वैमानिकाशी संपर्क साधून विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. तेथे सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली.
मुंबई पोलिसांनाही याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विमातळावर धाव घेतली. पण त्यापूर्वीच केंद्रीय सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी बैठक घेऊन तात्काळ कार्यवाही केली. विमानतळावर सुरक्षेच्यादृष्टीने योग्यती काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.