महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान, २३ तारखेला निकाल

Spread the love

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान, २३ तारखेला निकाल

योगेश पांडे/वार्ताहर

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक खालील प्रमाणे आहे –

निवडणुकीचं नोटिफिकेशन – २२ ऑक्टोबर २०२४.
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर
अर्जांची तपासणी -३०ऑक्टोबर २०२४
अर्ज मागं घेण्याची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४
मतदान – २० नोव्हेंबर २०२४
मतमोजणी – २३ नोव्हेंबर २०२४

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार असून त्यासाठी १ लाख १८६ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय ८५ पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.

महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी राज्यात पुरुष मतदार ४.९५ कोटी आणि स्त्री मतदार ४.६४ कोटी आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या ५६, ९९७ असून राज्यातील दिव्यांग मतदार ६.३२ लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नवमतदार १९.४८ लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून १०.७७ लाख मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने एप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, ९० मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यांत एकूण पोलिंग स्टेशन १ लाख १८६ असणार आहेत. शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या ४२ हजार ५८५ तर ग्रामीण महाराष्ट्रात ५७ हजार ६०१ मतदान बुथ केंद्र असणार आहेत. काही ठिकाणीं तरूण अधिकारी बूथ मँनेज करतील. ३५० असे बूथ असतील जिथे तरुण अधिकारी बूथ मॅनेज करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon