कौटुंबिक कलहातून लाचलुचपत प्रतिबंधक अमरावती विभागाचे अपर अधीक्षकावर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशकात वास्तव्यास असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती येथील अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्याविरोधात कौटुंबिक वादातून मुलास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित अनिल पवार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.अमरावती येथील ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागा’चे अपर पोलीस अधीक्षक अनिल पवार असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पवार यांचा पाथर्डी फाटा परिसरातील हरिविश्व सोसायटीत फ्लॅट आहे. शुक्रवारी पवार हे या ठिकाणी आले असता, मुलगा व पत्नीसमवेत त्यांचा वाद झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा अभिषेक (२५) याने इंदिरानगर पोलिसांशी संपर्क साधला असता, पोलिसांचे पथक तातडीने दाखलही झाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यात समझोता घडवून आणत पोलीस निघून गेले. मात्र, पोलीस जाताच संतापलेल्या पवार यांनी मुलास मारहाण केली व त्याचे डोके भिंतीवर आपटून गळा दाबला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी अभिषेकला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर संशयित अनिल पवार हे पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.