धक्कादायक ! पतीकडून धारधार शस्त्रानं पत्नीची हत्या; स्थानिक नागरीकांनी आरोपीला केलं पोलिसांच्या स्वाधीन
योगेश पांडे/वार्ताहर
मीरारोड – मिरा रोडच्या नयागर पोलीस ठाण्याच्या मागे एन.एच. शाळेजवळ पतीने आपल्या पत्नीची धारधार शस्त्रानं वार करुन हत्या केल्याची घटना घडली आहे. भर दुपारी झालेल्या या हत्येनं मिरा रोड हादरलं आहे. स्थानिक नागरीकांनी आरोपी पतीला तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. नदीम अहमद खान असं ३२ वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. तर अमरीन खान असं ३६ वर्षीय मयत पत्नीचं नाव आहे. गेल्या वर्षभरापासून पती पत्नीचा कौटुंबिक वाद होता. यांना दोन मुलं आहेत. एकाचं वय १२ तर दुसऱ्याचं वय २ वर्ष आहे. दोन्ही मुलं वडिलांकडे रहातात. सध्या हा कौटुंबिक वाद न्यायालयात सुरु आहे. अमरीन नं आपल्या २ वर्षाच्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायलयाने पोलीस बंदोबस्तात मुलाच ताबा वडिलांकडून घेण्याचे आदेश दिले होते.गुरुवारी ती पोलिसांना घरी घेवून गेली असताना, तिला मुलं मिळाली नाहीत. दोन्ही मुलं आई बरोबर अजमेरला गेल्याच आरोपी पतीने सांगितलं होतं. मात्र, शुक्रवारी ती एकटीच मुलगा शाळेत गेला आहे का? हे बघण्यासाठी एन.एच. शाळेजवळ गेली होती. यावेळी तिथं नदीम आणि तिच्यात जोराचं भांडण झालं आणि नदीमनं तिच्यावर धारधार शस्त्राचे वार करुन, तिला ठार मारलं. पोलीसांनी आरोपीला पकडून गुन्हा नोंद केला असून तपास करत आहे.