नाशिकमध्ये हायप्रोफाइल नशेबाजी उघडकीस, एमडी’च्या दरात गांजा विकणाऱ्या दोघांना गांजासह अटक
योगेश पांडे/वार्ताहर
नाशिक – वर्षभरापूर्वी नाशिकमध्ये मॅफेड्रॉनचे (एमडी) कारखाने उद्ध्वस्त झाल्यानंतर आता थेट परदेशातून गांजा आयात केला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गंभीर बाब म्हणजे, ‘एमडी’प्रमाणेच प्रतिग्रॅम दीड ते दोन हजार रुपयांनी हा गांजा विक्री होत आहे. शहरातील ‘हायप्रोफाइल’ व्यक्तींमध्ये ही नशेबाजी होत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे ‘एमडी’पाठोपाठ ‘हायप्रोफाइल’ गांजा तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सन २०२३ मध्ये नाशिकमध्ये एमडीचे कारखाने उद्ध्वस्त झाल्यावर ललित पानपाटील, सनी पगारे व अर्जून पिवाल, छोटी भाभीच्या टोळीला अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) बेड्या ठोकल्या. त्यावेळी नाशिकमध्ये कारखान्यातून सर्वसाधारणपणे आठशे ते एक हजार रुपये प्रतिग्रॅम ‘एमडी’ची विक्री झाल्याचे समोर आले. तर ड्रग्ज पेडलर्स हाच ‘एमडी’ नशेबाजांना दीड ते दोन हजार रुपये प्रतिग्रॅम दराने विक्री करीत होते. पोलिसांनी टोळ्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर ‘एमडी’ तस्करी नियंत्रित झाली. परंतु, आता थायलंडमधून गांजा नाशिकपर्यंत आणून ‘एमडी’च्या दरात त्याची विक्री केली जात आहे. झेंडूच्या फुलांप्रमाणे या गांजाचा गंध आहे. केवळ हौस’ म्हणून या स्वरूपाची नशा केली जात असून, त्यासाठी हवी तितकी किंमत मोजण्याची नशेबाजांची तयारी आहे. ‘एनडीपीएस’ने विशाल वसंत बावा गोसावी – २५ व लविन महेश चावला- २६ या दोघांना ६८६ ग्रॅम वजनाच्या परदेशी गांजासह अटक केली. त्यातील गोसावी हा सराईत गुन्हेगार असून, एका मित्राच्या मदतीने कुरिअरद्वारे त्याने हा गांजा मागवला. ‘एमडी’प्रमाणे या गांजाची विक्री होत असल्याने पोलिसही सतर्क झाले आहेत.
गोविंदनगरच्या रस्त्यावर थायलंडचा गांजा ओढणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले. संकल्प अजय राठी (२९) आणि मोनिष ताराचंद दलवानी (३२) या संशयितांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांत गुन्हा नोंद आहे. हे दोघेही गोविंदनगर रस्त्यावर थायलंडच्या गांजाचे सेवन करीत होते. हे दोघेही संशयित व्यावसायिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, थायलंडमधील गांजाचे सेवन करणारे इतरही संशयित नाशिकमध्ये आहेत. महिलांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. विक्रेत्यांकडून नशेबाजांची माहिती घेत पोलिसांनी पाळत ठेवली आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये अनेकांची नावे उघड होण्याची शक्यता आहे.