सोशल माध्यमातील ओळख पडली महागात, भेटवस्तूच्या आमिषाने महिलेची १२ लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात दिवसेंदिवस फसवणूक, मुली व महिल्यांवर अत्याचार, सायबर फसवणूक, बलात्कार अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने वाढत आहेत. अशीच एक घटना घडली आहे. अनोळखी व्यक्तीशी झालेली मैत्री एका महिलेला महागात पडली. सायबर चोरट्याने परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलेची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिलेचे समाज माध्यमात खाते आहे. समाज माध्यमातून महिलेची सायबर चोरट्याशी ओळख झाली होती. चोरट्याने परदेशात नोकरी करत असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर चोरटा आणि महिलेची ओळख झाली. परदेशातून भेटवस्तू पाठवितो, असे आमिष दाखवून चोरट्याने तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्याने महिलेशी संपर्क साधला. परदेशातून भेटवस्तू पाठविण्यात आल्या असून, विमानतळावर सीमाशुल्क विभागाने भेटवस्तू ताब्यात घेतल्या आहेत. भेटवस्तू सोडविण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे चोरट्याने सांगितले. त्यानंतर चोरट्याने महिलेला एका बँक खात्यात तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने बँक खात्यात वेळोवेळी ११ लाख ९५ हजार रुपये जमा केले. भेटवस्तू न मिळाल्याने महिलेने चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत.