अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
योगेश पांडे/वार्ताहर
अकोला – एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून नेतेमंडळी व कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत. त्यातच, अकोल्यात मे २०२३मध्ये दंगल झालेल्या हरिहरपेठ भागात पुन्हा दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. या तणावावरुन अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठा जमाव रस्त्यावर उतरल्याचंही दिसून आलं. या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावर मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
हरिहरपेठ भागात गाडगे महाराजांचा पुतळा आहे, त्या परिसरात ही दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे. दोन गटात शुल्लक कारणावरून तणाव निर्माण झाला असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिस व सुरक्षा फोर्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुरक्षा जवानांच्या पथकांकडून जमावाला पांगवण्यात येत आहे.