कोल्हापूरमध्ये अमानवीय कृत्य ! लघुशंका केल्याने मुलीच्या गुप्तांगाला चटके, सावत्र आईवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
कोल्हापूर – समाजामध्ये आईला देवत्व प्राप्त करून देण्यात आले आहे. आई म्हणजेच देव आणि देव म्हणजेच आई हे समीकरण झालेले आहे. मात्र कोल्हापूरात सावत्र आईने अमानवी कृत्य केले आहे. मुलीने झोपेत बिछाना ओला केल्यामुळे सावत्र आईने मुलीच्या गुप्तांगाला गरम उलथन्याने चटके दिल्याची संतापजनक घटना कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार आरोपी आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा मगरे असे आरोपी सावत्र आईचे नाव आहे. शुभम मोकिंदराव मगरे हे आपली दुसरी पत्नी व २ मुलांसह हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे भाडेकरू म्हणून राहतात. शुभम यांना पहिल्या पत्नीपासून एक ५ वर्षीय मुलगी आहे. शुभम शुक्रवारी काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची मुलगी घरात झोपली होती. ती दुपारी १२ च्या सुमारास झोपेतून उठली. त्यावेळी तिने अंथरुणात लघुशंका केली होती. हा प्रकार तिची सावत्र आई पूजा मगरे हिला सहन झाला नाही. उलथने गरम करून दिले चटके
रागाच्या भरात पूजा यांनी स्वयंपाक घरातील उलथने गरम करून मुलीला तिच्या गुप्तांगासह गाल, ओठ व गळ्याजवळ चटके दिले. या घटनेत पीडित मुलीचा चेहऱ्याला गंभीर इजा झाली. ही घटना घडली तेव्हा या दोघीच घरात होत्या. काही वेळाने शुभम घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी या प्रकरणी पूजा मगरे यांना जाब विचारला असता त्यावर त्यांनी मुलीने बिछाना ओला केल्यामुळे तिला शिक्षा दिल्याचे सांगितले. त्यानंतर शुभम यांनी थेट शिरोली पोलिस ठाणे गाठून पूजा मगरे हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सावत्र आईला ताब्यात घेतले आहे. या अमानवीय घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.