संकेत बावनकुळे ला प्रत्यक्षदर्शीनी चोपला, मात्र पोलिसांकडून अभय; संकेतवर गुन्हा दाखल करण्याची अंधारे यांची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर – राज्यात सध्या नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरण गाजत आहे. सुषमा अंधारे यांनी बुधवारी बर्डी पोलिस ठाण्यात जावून पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकारे, पोलिस उपायुक्त राहुल मदने यांची भेट घेत ऑडी अपघाताचा घटनाक्रम समजावून घेतला. त्या नंतर माध्यमांशी बोलताना अंधारे यांनी पोलिसांवर प्रकरण दडपत असल्याचा आरोप केला. पुण्यातील पोर्शेकार अपघाता प्रमाणे संकेत बावनकुळेलाही निबंध लिहायला लावून सोडून देणार का? पत्रकारांशी संवाद साधताना अंधारे यांनी पोलिस खात्याची चांगलीच झाडाझडती घेतली.
या घटनेच्या संदर्भात अंधारे यांनी पोलिसांना या घटनेबाबत काही प्रश्न देखील विचारले आहे. एखादा अपघात घडतो किंवा अशी काही घटना होते, तेव्हा गाडी पोलिस ठाण्यात नेली जाते. मात्र बावनकुळेंच्या मुलाची गाडी गॅरेजमध्ये दुरूस्ती करण्यासाठी का देण्यात आली, असा प्रश्न अंधारेंनी पोलिसांना विचारला. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अंधारेंनी केला आहे. प्रारंभी संकेत बावनकुळे गाडीत नव्हते असे भासवण्यात आले. नंतर ते गाडीत असल्याचे सांगण्यात आले. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी संकेत बावनकुळे गाडीत मागे बसलेला होता असे सांगितले. तर पोलिसांनी तो ड्रायव्हरच्या बाजूला बसल्याचे सांगितले. नागपुरात ३५०० सीसीटिव्ही आहे. गाडीने प्रवास केला त्या ठिकाणचे फुटेज तपासले का, अशा प्रश्नांची सरबत्ती अंधारेंनी पोलिसांवर केली. संकेत बावनकुळेंचे मेडिकल का नाही केले, यावर पोलिसांनी घटनेनंतर संकेत तिथून पळून गेला होता असे सांगितले. १२ तास उलटून गेल्यानंतर वैद्यकीय चाचण्यांचा काहीही उपयोग होत नाही. या कारणामुळे आम्ही संकेतची वैद्यकीय चाचणी केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
रविवारी रात्री बारा – साडेबाराच्या दरम्यान यांनी लाहोर बारमध्ये मद्य घेतलं होतं,बीफ कटलेटही खाल्लं. अपघात झाल्यावर गाडीचा नंबर, डिटेल्स एफआयआरमध्ये का नाहीत ? गाडीचे डिटेल का आले नाही, संकेतचं मेडिकल का केलं नाही. अपघाता वेळी गाडीचा स्पीड १५० च्या आसपास होता, रॅश ड्रायव्हिंगमुळेच हा अपघात झाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते , असा आरोपही त्यांनी लावला. बावनकुळे म्हणतात माझ्या मुलाची चौकशी करा, पण अजून त्यांच्या मुलाचं नाव एफआरआय मध्ये आलंच नाही. बावनकुळे यांची ताकद भारी पडत असेल म्हणून पोलीस संकेतचं नाव एफआरआय मध्ये घेत नाही असे म्हणत पोलिसांना ३६ तास का लागले असा सवाल त्यांनी केला. जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर दबाव आहे, म्हणून ते एफ आर आय मागे घेणार असल्याचं कळतंय असा आरोपही अंधारे यांनी केला. खरच निष्पक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर संकेत च नाव एफआरआयमध्ये दाखल करा असा आदेश गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली.
संकेत बावनकुळे बारमध्ये दूध प्यायला गेला होता का ?
ऑडी कारचा अपघाता झाला तेव्हा संकेत आणि त्याचे दोन मित्र कारमध्येच होते. तो गाडी चालवत नव्हता असं सांगितलं जातं आहे. संकेतने दारू प्यायली नव्हती असं म्हटलं जातंयं, मग तो मित्रांसोबत बारमध्ये का गेला होता, तेथे तो दूध प्यायला गेला होता का ? असा सवाल विचारत संकेत बावनकुळे वर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणीही अंधारे यांनी केली.