नालासोपाऱ्यात ३० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार, आरोपींना पोलीस कोठडी
पोलीस महानगर नेटवर्क
नालासोपारा – राज्यात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कायद्याचा धाक उरलेला दिसत नाही. अशीच एक घटना नालासोपारा येथे घडली आहे. नालासोपाऱ्यात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तिघांनी मिळून हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघडकीस आले. पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद देताच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
नरेंद्र मोरया, प्रकाश सिंह, पंचराज सिंह अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली. या तक्रारीनंतर, विविध कलमांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित महिला ही पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तिने घडला प्रकार सांगितला. त्यानंतर नालासोपाऱ्यातील आचोळे पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या अत्याचार प्रकरणातील आरोपी नरेंद्र मोरया, प्रकाश सिंह, पंचराज सिंह यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.आचोळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.