नालासोपार्यात १० वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; आचोळे पोलीसांनी दोघांना केली अटक
योगेश पांडे/वार्ताहर
वसई – नालासोपार्यात १० वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आचोळे पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नालासोपारा पूर्वेच्या शिर्डीनगर परिसरात ही १०वर्षीय पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. २ सप्टेंबर रोजी परिसरात गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी ही मुलगी गेली होती. तिथून घरी परतत असताना घराच्या जवळच्या परिसरात दोन व्यक्तींनी तिला रस्त्यात अडवून तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
या पीडित मुलीचे कपडे रक्ताने खराब झाले होते. व तिची प्रकृती ठीक नसल्याने घरच्यांना मुलीसोबत गैरप्रकार घडल्याचा संशय आला. त्यानंतर मुलीची चौकशी केली असता घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या आईने आचोळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. याचा अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे. यापूर्वी सुध्दा नालासोपारा पूर्वेच्या भागात १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. एकापाठोपाठ एक अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने पुन्हा एकदा महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.