साडेचार कोटींच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी – राज्यात ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज कोट्यवधी रुपयांची सायबर चोरटे नागरिकांच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. नागरिक आमिषाला बळी पडून आपली फसवणूक करून घेत आहेत अशीच एक घटना पिंपरी परिसरात घडली आहे. कंपन्यांमध्ये टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची चार कोटी ४१ लाख ३५ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ फेब्रुवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मोशी आणि नाशिक फाटा येथे घडली. ओंकार श्यामराव जोशी (रा. पिंपळे सौदागर), सदाशिव नामदेव पुंड (रा. मोशी) आणि नवज्योत सरतापे (रा. पिंपळे सौदागर) अशी गुनहा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संजय रामचंद्र हजारे (वय ५०, रा. हजारे वस्ती, मोशी) यांनी गुरुवार दि. ५ सप्टेंबर, २०२४ रोजी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या मातिहीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना विविध कंपन्यांचे कॉर्पोरेट लायसन्स, व्हेंडर कोड व कंपन्यांचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखविले. या टेंडरमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा २० टक्के नफा मिळेल, असे सांगितले. आरोपी ओंकार जोशी याने तो सेंट्रल मिनिस्टीलमधील कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने आपली संचालक पदावर नियुक्ती झाल्याचे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून १० कोटी ५८ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले तसेच व्यवसायात नफा झाल्याचे सांगत फिर्यादी यांना ४ कोटी ७५ लाख ६५ हजार रुपये दिले तसेच मुद्दल १ कोटी १६ लाख रुपये व समजुतीच्या करारनाम्यानुसार २५ लाख ५० हजार असे एकूण ६ कोटी १७ लाख १५ हजार रुपये परत केले. उर्वरित ४ कोटी ४१ लाख ३५ हजार रुपये परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.