धक्कादायक ! मुंबईत बॅंक कर्मचाऱ्याची अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्या; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – एका ३५ वर्षीय बँक कर्मचाऱ्याने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. ॲलेक्स रेगी असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. रेगी हा पुण्याचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तो एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲलेक्स रेगीने आपली कार पुलावर थांबवली आणि समुद्रात उडी मारली. न्हावा-शेवाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रेगीचा मृतदेह नंतर सापडला. रेगीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की त्यांच्यावर कामाचा दबाव होता. परंतु घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर गेल्या काही महिन्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सेतूवर वाहने थांबविण्यास बंदी असताना देखील प्रवासी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाहने थांबवत असतात. सध्या अटल सेतूवर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या आता पुन्हा एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घडलेल्या घटनेचा तपास न्हावाशेवा पोलीस करत आहेत. आत्महत्या केलेल्या व्यक्तीने कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली असल्याचे कुटुंबाकडून बोलले जात आहे. मात्र, अद्याप सुसाईट नोट पोलिसांच्या हाती नसल्यामुळे ह्या व्यक्तीने आत्महत्या का केली याचे कारण समोर आले नसून न्हावाशेवा पोलीस अधिक तपास करत आहेत.