दोन वर्षापूर्वी अंबरनाथमध्ये बेधुंद गोळीबार करून फरार झालेले दोन आरोपी अखेर कल्याण गुन्हे शाखेच्या जाळ्यात
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – अंबरनाथ येथील एमआयडीसीत दोन वर्षापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन फरार आरोपींना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील घारिवली गावातून अटक केली आहे. मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या या दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विविध भागात शोधकार्य सुरू ठेवले होते. अखेर हे दोन्ही गुन्हेगार कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना सापडले.
किरण अशोक गायकवाड (३५) आणि दिपेश तुळशीराम जाधव (३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन वर्षापूर्वी अंबरनाथमध्ये बेधुंद गोळीबार करून फरार झालेले दोन गुन्हेगार डोंबिवली जवळील घारिवली गाव हद्दीतील रुणवाल गार्डन गृहसंकुल भागात एकमेकांना गुप्तपणे भेटण्यासाठी येणार आहेत अशी गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना दिली.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, हवालदार गुरनाथ जरग, विलास कडू, उमेश जाधव, अमोल बोरकर यांनी रुणवाल गार्डन भागात सापळा लावला. ठरल्या वेळेत आरोपी किरण गायकवाड, दीपेश जाधव घटनास्थळी आले. त्यांना परिसरात पोलिसांनी सापळा लावल्याची कुणकुण लागताच, त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना घारिवली गाव हद्दीत पकडले.