टिटवाळ्यात दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून नराधमाकडून लैंगिक अत्याचार
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच, टिटवाळ्यात दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करत ३५ वर्षीय व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच टिटवाळा पोलिसांनी काही वेळातच या नराधमाला बेड्या ठोकल्या. सोमनाथ ठाकरे असे त्या आरोपीचे नाव आहे. टिटवाळा परिसरातील एका गावात पीडित मुलगी कुटुंबासह राहते. सोमनाथही याच परिसरात राहतो. घराबाहेरील अंगणात खेळत असताना सोमनाथने तिचे अपहरण केले. यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला तिथेच सोडून त्याने पळ काढला. बराच वेळाने पालकांना मुलगी अंगणात नसल्याचे दिसताच तिची शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी ती निर्जनस्थळी रडताना आढळली. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी सोमनाथला शेजारच्या गावातून ताब्यात घेतले. त्याला कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता, ६ सप्टेम्बर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.