महिला पत्रकाराला शिवीगाळ, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना पुन्हा मोठा धक्का
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना मुंबई हायकोर्ट पाठोपाठ आता कल्याण कोर्टानेदेखील धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार वामन म्हात्रे यांनी कल्याण कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी कोर्टात गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी कल्याण न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंगला मोटे यांनी वामन म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला. हा वामन म्हात्रे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. अटकपूर्व जामीन मंजूर न झाल्याने वामन म्हात्रे यांना अटकेपासून संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे पोलीस वामन म्हात्रे यांना ताब्यात घेऊन चौकशी देखील करु शकतात. वामन म्हात्रे यांच्यावर महिला पत्रकाराला अपशब्द आणि जातीवाचक बोलण्याचा आरोप आहे. त्यामुळे वामन म्हात्रे यांच्याविरोधात बदलापूर येथे विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आपल्याला अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी वामन म्हात्रे यांनी कल्याण कोर्टात धाव घेतली होती. पण त्यांना कल्याण कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत, या प्रकरणी कल्याण कोर्टाने निर्णय घ्यावा, असा आदेश कल्याण कोर्टाला दिले. यानंतर या प्रकरणी गुरुवारी कल्याण कोर्टात सुनावणी पार पडली.
वामन म्हात्रे यांच्याकडून वकील दर्शन सावंत यांनी युक्तिवाद केला. तर पीडित मोहिनी जाधव यांच्याकडून भूषण बेंद्रे यांनी युक्तिवाद केला. यावेळी कायद्याचा धाक राहिला पाहिजे, अशी मागणी करत वामन म्हात्रे यांची याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद करण्यात आला. कल्याण न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंगला मोटे यांनी संबंधित युक्तिवाद ग्राह्य धरत वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.