राज्यस्तरीय उत्कृष्ठ गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन
५ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक-जिल्हाधिकारी गोविंद बोडके
प्रमोद तिवारी
पालघर: महाराष्ट्र शासनाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय येथे गणेश मंडळ व शांतता समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, जिल्हा शांतता कमिटीचे पदाधिकारी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. परिपूर्ण भरलेला अर्ज [email protected]/palghargeneral२२०@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल असे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.
सदर स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरीता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृती तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनीप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणुन प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.
७ सप्टेंबरपासून सुरू होणा-या गणेशोत्सवात जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पुर्ण करुन राज्यस्तरीय समितीकडे शिफारस करेल.
राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख २.५ लाख आणि १ लाख रूपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना रू. २५०००/- रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.