फेरीवाल्याकडून ८ वर्षीय मुलीचा विनयभंग; नागपाडा पोलिसांनी पोक्सोअंतर्गत आरोपीला केली अटक
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई– नागपाडा येथे कर्णफुल, बांगड्या विकण्यासाठी आलेल्या फेरीवाल्याने ८ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी फेरीवाल्याला नागपाडा पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुबेर शाह (४५) असे अटक आरोपीचे नाव असून तो शीव परिसरातील रहिवासी आहे. आरोपी कर्णफुले, बांगड्या आदी वस्तू विकतो. आरोपी मंगळवारी नागपाडा परिसरात कर्णफुले विकण्यासाठी आला होता. त्यावेळी ८ वर्षांची मुलगी त्याच्याकडील वस्तू पाहत असताना त्याने तिचा विनयभंग केला. इतर महिलांनी हा प्रकार पाहिला आणि त्या आरोपीला ओरडल्या. त्यावेळी घाबरलेला शाह तेथून पळू लागला. त्याला पकडून नागपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.