लोकप्रतिनिधींचे घालीन लोटांगण ! मीरा- भाईंदरमध्ये कुख्यात महिला गुंडाचं जंंगी बर्थडे सेलिब्रेशन; आजी- माजी आमदारांची हजेरी!
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्यातील कायदा व सुव्यवस्था एकीकडे घटका मोजत असताना दुसरीकडे भाजपचे लोकप्रतिनिधी लेडी डॉन समोर घालीन लोटांगण करीत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यातील महायुती सरकार गुंडांना पोसत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत असून अशातच मीरा भाईंदरमधील एका कुख्यात महिला गुंडांच्या वाढदिवसाला चक्क आजी- माजी आमदार अन् स्थानिक नेत्यांनी हजेरी लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या जंगी बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहेत. महायुतीतील काही आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना विरोधकांना चोपून काढा पोलीस काहीही करणार नाहीत अशी आश्वासने मिळाल्यावर गुंडांना तर अधिकच बळ मिळत असावे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी (१५, ऑगस्ट) रोजी मीरा- भाईंदरमधील कुख्यात महिला गुंड गुलशन पटेल उर्फ आप्पाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. गुलशन पटेल यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे या वाढदिवसाला स्थानिक आमदार गीता जैन , माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. मीरा भाईंदर परिसरामध्ये गुलशन पटेलची मोठी दहशत आहे. तिच्यावर अपहरण, मारहाण, धमकावून जमीन बळकावणे, अवैध शस्त्र वापरणे असे गंभीर स्वरुपाचे ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. अशा कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाला नेत्यांनी हजेरी लावल्याने परिसरामध्ये उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. राज्यात एकीकडे खून, मारामाऱ्या, जीवघेण्या हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत. अशातच आता गुंडांच्या बर्थडेला हजेरी लाऊन लोकप्रतिनिधी त्यांना बळ देत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोही आमदार गिता जैन यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यामुळे गुंडांना नेत्यांचा वरदहस्त आहे का? असा सवाल नागरिकांनी दैनिक ‘पोलीस महानगर’ शी बोलताना उपस्थित केला.