दरोडेखोराच्या तयारीत असलेल्या टोळीला खेतिया पोलिसांनी केले जेरबंद !
संशयितांपैकी दोन अल्पवयीन तर सात नंदुरबार जिल्ह्यातील
नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
नंदुरबार – शहादा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या खेतिया (ता. पानसेमल, मध्य प्रदेश) येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आठ दरोडेखोरांच्या टोळीला बडवानी पोलिसांनी शुक्रवारी दि. ९ ऑगस्टला रात्री अटक केली आहे तसेच त्यातील एका संशयिताकडे शहादा येथे घरफोडीत फौजदाराचे चोरीस गेलेले शासकीय पिस्तूल आढळून आले आहे. त्यामुळे या टोळीकडून जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांची देखील उकल होण्याची शक्यता असल्याने नंदुरबार जिल्हा पोलिसांनी त्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या टोळीतील आठपैकी सात जण नंदुरबार जिल्ह्यातील असल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या आठ मध्ये दोन विधी संघर्ष बालक आहेत. संशयीतांकडून सुमारे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खेतिया पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री खेतिया नजीकच्या एका पेट्रोल पंपावर महाराष्ट्रातील दरोडेखोरांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती खेतिया पोलिसांना मिळाली होती. खेतिया जवळील बायगौर रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची कार संशयीतरीत्या उभी असल्याचे आढळून आली. कारमधील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळताच पोलिसांच्या पथकाने कारला घेरले. कारमध्ये आठ जण आढळून आले. त्यापैकी एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. सातही जणांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्तूल, लोखंडी फरशा, चाकू, रॉड, लाकडी दांडका, कुऱ्हाड आढळून आले. या संशयितांमध्ये रोहित दिलीप गावित (१८, रा. चिंचपाडा, ता. नवापूर), विष्णू जयसिंग चौधरी (१८, रा. तोरणमाळ, ता. धडगाव), अमोल ईश्वर गावित (२०, रा. सेतगाव, ता. नवापूर), करण राजेश नाईक (२९, रा. तोरणमाळ, ता. धडगाव), बबलू ऊर्फ अलीखान अफलखान पठाण (रा. तोरणमाळ, ता. धडगाव) यांचा समावेश आहे. या आठमध्ये मध्यप्रदेशातील निवाली येथील रेमा ऊर्फ रमेश ऊर्फ त्रिशूलबाबा सोहज्या जमरे (वय २५) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पैकी बबलू पठाण हा अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाला. यातील रोहित दिलीप गावित याच्याकडे एक शासकीय ९ एमएमचे पिस्तूल आढळून आले. त्याची अंदाजे किंमत दीड लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले. सदरचे पिस्तूल हे शहादा येथील राहत असलेले सारंगखेड्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान कोळी यांची चोरीस गेलेली शासकीय पिस्तूल असल्याचे स्पष्ट झाले.
सर्व संशयितांना खेतिया पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यातील एक वगळता सर्वच नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. खेतिया येथील त्रिशूलबाबा नामक व्यक्ती त्यांना येऊन मिळाला होता. त्याच्याच मदतीने दरोड्याचा प्लॅन रचला होता, असे पोलिसांनी सांगितले. या सर्व संशयितांकडून कार, पिस्तूल, मोबाइल व हत्यारांसह एकूण ९ लाख ३१ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खेतिया पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मण्डलोई, उपनिरीक्षक कमल चौहान, सीताराम भटनागर, हवालदार आनंद तिवारी, राजेंद्र बर्डे, विकास सेन, हेमंत मण्डलोई, हेमंत कुशवाह, शिवराज मण्डलोई, राजेश किराडे, सुनील मुवेल, लीलाशंकर पाटीदार यांनी केली. दरम्यान, खेतिया पोलिसांनी जेरबंद केलेल्या टोळीने नंदुरबार जिल्ह्यात गुन्हे केले असण्याची दाट शक्यता आहे. यातील पिस्तूल चोरीचा एक गुन्हा कबूल केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य घरफोडीच्या गुन्ह्याचा उकल करण्याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, नंदुरबार जिल्हा पोलिसांसह त्याच्या गुप्त खबाऱ्यांना या टोळीचा आतापर्यंत सुगावा कसा लागला नाही, पिस्तूल चोरटे जिल्ह्यातीलच असताना पोलिसांना त्याची माहिती मिळू शकली नाही अशी प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पोलिस या टोळीकडून किती गुन्हे उघडकीस आणतात याकडे लक्ष लागून आहे.