कुरियरद्वारे कोट्यवधीच्या अमली पदार्थांची तस्करी
एनसीबी कडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना ठोकल्या बेड्या.एकूण पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त.
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. यात ७५ किलो गांजा आणि ४८ हजार कोडिन बॉटल अशा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. उल्हासनगर येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत छापा घातला. या टोळीतील तस्करांनी कुरियरद्वारे अमली पदार्थ मागवल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने थेट कारवाईचा बडगा उगारत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सहा तस्करांना जेरबंद करून त्यांच्याकडून ७५ किलो गांजा आणि ४८ हजार कोडिनच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार उल्हासनगर मधील एका कुरिअरच्या कार्यालयाबाहेर एक व्यक्ती पार्सल घेण्यासाठी आला होता. त्या व्यक्तीने ते पार्सल घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. विनोद पी असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या चौकशीत त्याने टोळीतील इतरांची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील इतर पाच जणांना भिवंडीतील एका चौकामध्ये कारमध्ये बसलेले असताना त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांच्याकडून १ लाख १८ हजार ८८० रुपये आढळले.
उल्हासनगर मधील कुरियर येथून पकडण्यात आलेल्या एका संशयित आरोपीमुळे भिवंडी मधील पाच संशयित आरोपींना पकडण्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. मनीष पी, आकाश पी, राज के, मोहनीश एस आणि सनी जे असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असून या सर्वांना आता अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ट्रॅव्हल्स बॅग, ट्रॉली बॅग असा एकूण पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणी आणखी काही धागे उलगडतात का, त्या दिशेने पोलीस तपास करत आहे.