पिंपरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची ५ कोटींची फसवणूक; सांगवी पोलीसात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी – पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीबरोबर फसवणूकीचे प्रमाण देखील वाढले आहे.अशीच एक फसवणूकीची घटना पिंपरी परिसरात घडली आहे. युनिव्हर्सल कॉलेज ऑफ नेटवर्क इंजिनिअरिंग आणि रिसर्च या कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम केल्यानंतर त्याचे पैसे न देता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार काशीद पार्क पिंपळे गुरव येथे घडला.
किशोर गारवे (६७, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिसात फिर्याद दिली. सज्जन पंडितराव देशमुख, श्याम सज्जन देशमुख (दोघे रा. एनडीए रोड, पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी गारवे यांना संशयितांनी त्यांच्या कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम करण्याचे कंत्राट दिले होते. त्याप्रमाणे गारवे यांनी कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. त्या इमारतीचा संशयितांना ताबा दिला. त्या बदल्यात बांधकामाची ठरलेली रक्कम व त्यांच्या आर्थिक अडचणीच्या वेळी दिलेली रक्कम एकूण पाच कोटी १० लाख रुपये गारवे यांना दिली नाही.त्यामुळे गारवे यांनी सांगवी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.