ठाण्यात योगा शिक्षिकेची ऑनलाईन आर्थिक फसवणूक; राबोडी पोलिसांत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
राबोडी – राज्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यानी धुमाकूळ घातला आहे. ऑनलाईन फसवणूक होत असून देखील नागरिक आमिषाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. ठाण्याच्या राबोडीत अशीच एक घटना घडली आहे. टेलिग्रामवरून ऑनलाईन टास्क देऊन अनेकांच्या आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या असताना, त्यात आणखी एका योगा टीचरची भर पडली आहे. सायबर भामट्यांनी या योगा टीचर असलेल्या महिलेची ऑनलाईन टास्कसाठी आर्थिक आमिष दाखवून तब्बल २.६२ लाखांना गंडा घातला आहे. याबाबत महिलेने राबोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार, महिला योगा टीचर असून त्यांना टेलिग्राम वर अमेझॉन इंडिया बेनिफिट्स वर्किंग ग्रुप यामध्ये ॲड केले होते. ऑनलाईन टास्कमध्ये पैसे गुंतविल्यास चांगले पैसे परताव्यापोटी मिळतील, असे सांगितले. चोरट्यांनी वेळोवेळी त्याच्याकडून ऑनलाईन पद्धतीने २ लाख ६२ हजार रुपये घेतले. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २०० चे कलम ६६(क), ६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खणकर हे करीत आहेत.