भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ, बीडमध्ये पावडरच्या ६०० गोण्या जप्त; एका आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – दुधात भेसळ करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सज्जड दम दिला आहे. तसेच, दुधात भेसळ केल्याचं निदर्शनास आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, दुसरीकडे बीड जिल्ह्यात तब्बल ६०० पोती पावडर सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी अमिया फाट्याजवळ असलेल्या एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा ६०० गोण्या असलेला साठा अन्न सुरक्षा प्रशासन व पोलिसांनी धाड टाकुन जप्त केला. रविवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. अंबादास पांडुरंग चौधरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी याचे कडा येथील टाकळी अमिया रोडलगत साईदत्त एंटरप्राययजेस नावाने दुकान आणि लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन देखील आहे. या गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दूध निर्मित्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व पोलीस प्रशासनाने आज पहाटे या ठिकाणी धाड टाकली. गोडाऊनची पाहणी केली असता भेसळयुक्त दुधाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा आढळून आला. त्यानंतर, पोलीस व अधिकाऱ्यांनी या पावडरची पाहणी करुन, तपासणी केली. त्यानंतर, या गोदामात आणखी किती बॅग्ज आहेत, याचीही शहानिशा केली. त्यावेळी, तब्बल ६०० गोण्या पावडर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एकीकडे दुधाला चांगला दर मिळावा म्हणून शेतकरी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपुढे गाऱ्हाणे मांडतो. दुध उत्पादक संघ किंवा डेअरी मालकांकडून दुधाला योग्य दर दिला जात नाहीत. अनेकदा दुधाच्या फॅटवरुनही डेअरचालक आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होताना दिसून येतो. तर, डेअरीमध्ये दूध पावडरचा वापर करुन भेसळयुक्त दूधही बनवले जाते. दुधात होणारी भेसळ ही अनेकदा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ठरू शकते. त्यामुळे, भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणीही होत असते.