कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून दुर्घटना: अनेक गाड्या दबल्या, सुदैवाने जीवितहानी नाही

Spread the love

कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून दुर्घटना: अनेक गाड्या दबल्या, सुदैवाने जीवितहानी नाही

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी कारवाई सुरु असताना आता कल्याणमध्येही होर्डिंग कोसळ्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेत ही घटना घडली आहे. यामध्ये अनेक गाड्या दबल्या गेल्या पण सुदैवाने जीवितहानी टळली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. कल्याणच्या सहजानंद परिसरात भरदिवसा रहदारीच्या वेळी एकाएकी हे भलेमोठे होर्डिंग कोसळले. ते कोसळताच रस्त्यावरील नागरिकांची आणि वाहनचालकांची एकच धावाधाव झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही वेळासाठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

पावसासह सोसाट्याच्या वारा वाहत असल्याने ऐन रहदारीच्या वेळी होर्डिंग कोसळले. यामध्ये अनेक गाड्या होर्डींगखाली दबल्या गेल्या आहेत. परिणामी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्याचा वाहनचालकांना मोठा फटका बसला आहे. सहजानंद हा परिसर वर्दळीचा येथे अनेक दुकाने असून एक रुग्णालय देखील आहे. त्यामुळे ऐन रहदारीच्या वेळी होर्डिंग कोसळल्याने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले आहेत तर मनसे कार्यकर्त्यांनी देखील महापालिकेविरोधात आंदोलन छेडले आहे. सहजानंद चौकात ठिय्या देत मनसैनिक आंदोलन करत आहेत. जोपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका या सर्व घटनांवर अधिकृत तोडगा काढणार नाही, तोपर्यंत जागेवरुन हलणार नसल्याची भूमिका मनसैनिकांनी घेतली आहे. पावसाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने घाटकोपर येथे मोठी दुर्घटना घडली होती. पेट्रोल पंपावप महाकाय होर्डिंग कोसळल्याने १५ पेक्षा अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता. यामध्येच हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि न्यायालयात याचा खटला देखील सध्या सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये होर्डींग दुर्घटना त्यांची कारणं आणि परिणाम या क्रम तपासला जाणार आहे आणि महापालिकेच्या रेल्वे विभागाच्या जाहिरात फलक धोरणाबाबत या समितीतर्फे शिफारशी केल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon