कल्याणमध्ये ७ लाखांची लाच मागणारा पोलीस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – सात लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आणि तडजोडीअंती पाच लाख रुपये लाच स्वीकारण्यास तयार झालेल्या कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील हवालदार सुचित निवृत्ती ठीकेकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रादार यांच्या मित्राच्या मेहुण्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तक्रारदार यांच्या मित्रास आरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली. गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. ही रक्कम कमी करण्याची मागणी तक्रारदाराने केली. तथापी ठिकेकर या व्यवहाराला राजी होत नव्हता. अखेर सात ऐवजी पाच लाख रूपये स्वीकारण्यास हवा. ठिकेकर तयार झाला, मात्र त्यानंतर ठिकेकर पैशांसाठी तगादा लावत असल्यामुळे हा विषय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे यांना कळवण्यात आले. अधीक्षक लोखंडे यांनी दिलेल्या आदेशांनुसार अप्पर पोलिस अधीक्षक गजानन राठोड, महेश तरडे, पोलिस निरीक्षक विजय कावळे आणि यांच्या पथकाने ठिकेकर आणि तक्रारदार यांच्यात फोनवर होणाऱ्या संभाषणावर नजर ठेवली होती. यामध्ये ठिकेकर फसला. तक्रारदाराकडे लाच मागत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी ठिकेकर याच्या विरोधातील यासंदर्भातील तांत्रिक पुरावे जमा केले. त्या आधारे सरकारतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विजय कावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात बुधवारी हवा. सुचित ठिकेकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी लाचविरोधी पोलिस अधिक तपास करत आहेत.