पुण्यात पुन्हा हिट अँड रन; गस्तीवर असलेल्या पोलिसांना इनोव्हा कारने उडवले तर बीट मार्शलचा जागीच मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणानंतर आणखी एका घटनेने पुणे हादरले आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांना इनोव्हा कारने उडवले. यात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात पोलीस बीट मार्शल गस्तीवर होते. समाधान कोळी हे सहकाऱ्यांसोबत रविवारी मध्य रात्री गस्त देत असतानाच ही दुर्घटना घडली. दुचाकीरवरून गस्त घालत असतानाच एका भरधाव कारने दोन बीट मार्शलला उडवले. ही धडक इतकी जोरात होती की, यात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. समाधान कोळी असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमी पोलिसावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धडक दिलेली कार इनोव्हा होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांना धडक दिल्यानंतर कारचालक घटना स्थळावरून फरार झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आता त्या कार आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे.