डोंबिवली पुन्हा हादरली! न्यू एग्रो केमिकल कंपनीला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – डोंबिवली परिसरातील एमआयडीसी भागात पुन्हा एकदा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामुळे डोंबिवली पुन्हा हादरली आहे. एमआयडीसी फेज-२मधील एका कंपनीत मोठा स्फोट झाला. यानंतर तिथे भीषण आग लागली आहे. यामुळे परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात असलेल्या फेज २ मध्ये भीषण आग लागली. एमआयडीसी परिसरात असलेल्या न्यू एग्रो केमिकल या कंपनीला ही आग लागली, या कंपनीत कापड प्रिटींगसाठी लागणारे केमिकल बनवण्याचे काम केले जात होते.
रविवारी ७ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. त्यानंतर काही मिनिटातच ही आग सर्वत्र पसरली. प्राथमिक माहितीनुसार, इलेक्ट्रिक पार्किंगमुळे भीषण आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या ठिकाणी आग लागली, त्या ठिकाणी ६ कामगार काम करत होते. सुदैवाने ते सुखरुप बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.