जळगावात मी ईडी अधिकारी बोलतोय सांगून एका अभियंत्याला १५ लाखांचा गंडा
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव – गुन्हेगार नवनवीन क्लुप्त्या शोधून काढत नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणूक करण्यात यशस्वी होत आहेत. अशा भामट्यापासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे असे आवाहन पोलिसांतर्फे नेहमीच केले जाते, मात्र नागरिक घाबरून किंवा आमिषाला बळी पडून स्वताचे नुकसान करून घेतात. देशासह महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या घटना वाढल्या असून रोज फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होत आहे. अनेकांना वेगवेगळे आमिष दाखवून गंडविले जात आहे. याच दरम्यान भुसावळ येथील एका अभियंत्याला अज्ञात सायबर भामट्यांनी १५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुमच्याविरुद्ध ईडी ऑफिसमध्ये तक्रार झाल्याचे सांगत, तुम्हाला केव्हाही अटक होईल, अशी भीती घालून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत गुरुवार, दि.२७ जून रोजी दुपारी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील ५० वर्षीय अभियंत्यास बुधवारी, दि.२६ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासात बंद होईल असे सांगण्यात आले. फिर्यादीने कारण विचारले असता, तुम्ही मोबाईल क्रमांकावरून गैरप्रकार केला असून त्याबाबत मुंबई येथे तक्रार दाखल झाली आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास त्यांना दुसरा कॉल आला. त्या व्यक्तीने टिळक नगर पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षक विनायक बाबर बोलत असल्याचे सांगितले. तुमच्याविरुद्ध टिळक नगर पोलिस स्टेशन मुंबई येथे तक्रार दाखल झाली असून फिर्यादीला विविध कागदपत्रे मागविण्यात आली. फिर्यादीने कागदपत्रे पाठवल्यानंतर त्यांना सायबर भामट्यांनी इडी ऑफिसचे बनावट पत्र पाठविले. तुमच्या नावाने अटक वॉरंट तयार असून ते थांबवायचे असल्यास १५ लाख रुपये रक्कम द्यावी लागेल असा दम भरला. सायबर पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.