नवी मुंबईत १२५० रुपयांची थकबाकी न दिल्यानं कामगाराकडून पर्यवेक्षकाची हत्या, कळंबोली पोलीसांकडून आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Spread the love

नवी मुंबईत १२५० रुपयांची थकबाकी न दिल्यानं कामगाराकडून पर्यवेक्षकाची हत्या, कळंबोली पोलीसांकडून आरोपीच्या आवळल्या मुसक्या

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबईत अवघ्या १२५० रुपयांसाठी एका मजुराने सुपरवायझरची हत्या केली. ही घटना नवी मुंबईतील कळंबोलीच्या सेक्टर १४ येथे शुक्रवारी रात्री उशीरा घडली. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली, जिथून तो त्याच्या गावी पळून जाण्याच्या बेतात होता. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत. परवेझ अन्सारी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत तळोजा येथील एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. तर, आरोपी सद्दाम अन्सारीसोबत जुनैद अन्सारी, मुमताज अन्सारी आणि मोहम्मद कौसर अन्सारी हे त्याच्या हाताखाली काम करायचे. दरम्यान, घटनेच्या दिवशी परवेझ हा कामगारांची थकबाकी देण्यासाठी सेक्टर १४ येथे पोहोचला. त्याने सर्व कामगारांचे पैसे दिले. परंतु, हिशोबापेक्षा १२५० रुपये कमी मिळल्याने सुद्दामने परवेझसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यावेळी परवेझने त्याची राहिलेली थकबाकी २० जून पर्यंत देतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतर वाद शिगेला पोहचला आणि सुद्दामने रागाच्या भरात परवेझवर वार केले. त्यावेळी जुनैदने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुद्दामने त्याच्यावरही हल्ला केला.

इतर कामगारांनी जुनैद आणि परवेझ या दोघांनाही एमजीएम रुग्णालयात नेले, जिथे १५ जून रोजी उपचारादरम्यान परवेझचा मृत्यू झाला. तर, जुनैदवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी त्याच्या गावी पळून जाण्याच्या बेतात होता. परंतु, पोलिसांनी कल्याण स्थानकातून त्याच्या मुसक्या आवळल्या. हत्या, हत्येचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला अशा गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon