पुण्यात वृद्ध महिलेची २ कोटींची फसवणूक; ६ जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

पुण्यात वृद्ध महिलेची २ कोटींची फसवणूक; ६ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – वृद्ध महिलेच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन सहा जाणांनी धायरी येथील जागा कमी किमतीत विकून दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली तसेच दोघांनी महिलेकडे १० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांवर फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुलटेकडी येथे घडला आहे.

याबाबत तारामती सदानंद पाठक (वय-७५ रा. सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी मंगळवारी (दि.१८) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रवी सुरेश जाधव, (रा. लेन नं.५, कोरेगाव पार्क), चंद्रकांत गजानन पोकळे, चिंतामणी अंकुश पोकळे, (दोघे रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, धायरी), तरुणराज संजीव कुसाळकर, करण संजीव कुसाळकर, (दोघे रा. गुलमोहर पार्क, औंध), अभिजीत (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर भा.द. वि. ४०६, ४२०, ३८५, ३८६, ३८७, ५०६, १२०(ब), ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची धायरी येथे १ हेक्टर ३३.६ आर एवढ्या आकाराची जमीन आहे. आरोपी रवी जाधव याने इतर आरोपींसोबत संगनमत करुन फिर्यादी यांच्या वृद्धत्वाचा व आजारपणाचा गैरफायदा घेऊन विश्वास संपादन केला. फिर्यादी यांची धायरी येथील जमिनीच्या किमतीची खोटी माहिती देऊन दिशाभूल केली. रेडी रेकनरच्या दरानुसार ही जमीन तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची असताना आरोपींनी केवळ एक कोटी रुपयांना विकण्यास भाग पाडले. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली.

तसेच रवी जाधव आणि अभिजीत या दोघांनी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महिलेच्या घराजवळ असलेल्या स्वीस कॅफेत बोलवून घेतले. फिर्यादी दोघांना भेटण्यासाठी आले असता त्यांनी दहा लाख रुपये खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon