वडिलांच्या मदतीनं बहिणीच्या प्रियकराची हत्या, भावाला तळोजा पोलीसांनी केली अटक

Spread the love

वडिलांच्या मदतीनं बहिणीच्या प्रियकराची हत्या, भावाला तळोजा पोलीसांनी केली अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबईत वडिलांच्या मदतीने बहिणीच्या २० वर्षीय प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. पनवेलमधील देवीचापाडा येथे ही घटना घडली. ताहिर युसूफ शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या बहिणीने रविवारी दुपारी तिच्या प्रियकराला घरी बोलवून घेतले. मात्र, काही वेळाने युसूफ घरी परतला. त्याने दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसात मिळाला नाही. त्यानंतर युसूफने जबरदस्तीने दरवाजा उघडला असता त्याची बहीण समीर अब्दुल शेख नावाच्या प्रियकरासोबत आढळली. यामुळे ताहिर संतापला आणि त्याने त्याचे वडील युसूफ शेख – ४५ यांच्याशी संपर्क साधला, अशी माहिती तळोजा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली.

त्यानंतर पिता-पुत्रांनी समीरवर कोयत्याने आणि कुदळीने वार करून त्याची हत्या केली. समीरची मावशी मयनाखतुन अली शेख – २८ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांनी त्याला शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. समीरच्या डोक्यावर वार करून पाठीवर वार केल्याने गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी मुलीच्या भावाला ताब्यात घेतले असून वडिलांचा शोध सुरू केला आहे. दोघेही एमआयडीसी तुर्भे येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) आणि ३४ (समान हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीरची मावशी मायनाखातुन अली शेख हिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने तिच्यावर कोयत्याने वार करून पोटात लाथा मारल्या. कुटुंबीय त्यांच्या नात्याला विरोध करत होते,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon