मुंबईत बोगस नोकरी रॅकेटचा पर्दाफाश, परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – परदेशात नोकरीचे आमिष दाखवून अंधेरी पूर्व येथील लीला हॉटेलजवळील द एव्हेन्यू बिल्डिंगमध्ये बोगस नोकरी रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बोगस नोकरी रॅकेटच्या कार्यालयावर गुन्हे शाखेच्या ८ कक्षाने कारवाई केली आहे. गुन्हे शाखा कक्ष ८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी कारवाई केली. यावेळी शुभम अरविंद पुंडीर (वय २५), शुभम प्रदीप डे (वय २३), स्वप्नील सुनील नाईक (वय ३४) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संविधान कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१,३४ १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास कक्ष ८ कडे वर्ग करण्यात आला असता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ८ च्या कार्यालयास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. काही इसमांनी कट रचून परदेशात नोकरीस इच्छुक असलेल्या तरुणांची फसवणूक केली. त्यांनी दी ॲव्हेन्यु बिल्डींग, आयए प्रोजेक्ट रोड, चिमनपाडा,येथे ऑफिस सुरू केलं होते. तरूणांना परदेशात वेगवेगळया नामांकित कंपनीत नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली आहे. तरूणांना परदेशातील वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे बनावट जॉब ऑफर लेटर, संबंधित देशांचा बनावट वर्क व्हिसा आरोपींनी दिला होता. या प्रकरणात आरोपींनी प्रत्येकी लाखो रूपये वेगवेगळया बँक खात्यावर तसेच रोख स्वरूपात स्विकारले जात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून कक्ष ८ ला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीची आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष ८ ने दी ॲव्हेन्यु बिल्डींगवर छापा टाकून शुभम अरविंद पुंडीर, शुभम प्रदीप डे, स्वप्नील सुनील नाईक या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरेले साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून फसवणूक झालेल्या तरूणाने दिलेल्या फिर्यादीनूसार सहार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ३ मेंपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.