डोंबिवलीत खुनाचा प्रयत्न; पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – मध्यस्थी करण्यास आलेल्या महिलेस दोघांनी धारदार शस्त्राने व लाकडी बांबूने डोक्यावर मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला. जखमी महिलेला औषधोपचाराठी शिवाजी रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना दि. २८ मे रोजी डोंबिवलीत ही घडली. दिवसाढवळ्या ही घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. या प्रकरणी दीपक परती चव्हाण(३०, रा. वाघरी चाळ, डोंबिवली पूर्व) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी दीपक परती चव्हाण व त्याच्या दोन साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (२८, रा. सांगाव, डोंबिवली पूर्व) या त्यांचे कपडे घेण्यासाठी राजाजी पथ, डोंबिवली पूर्व येथे गेल्या असता, तिथे आरोपी दीपक चव्हाण, किसन चव्हाण व एक महिला दुसऱ्या एका महिलेस मारहाण करीत असताना फिर्यादी या भांडण सोडविण्यास गेल्या. त्या गोष्टीचा आरोपींना राग आल्याने त्यांनी त्यांच्या जवळील धारदार हत्याराने व लाकडी बांबूने फिर्यादी यांच्या डोक्यावर मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. | ५८२/२०२४, भा.द. वि. कलम ३०७,३२४,३२३,५०४,५०६,३४ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरळे हे करीत आहेत.