नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन जणांना अटक तर एक फरार

Spread the love

नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन जणांना अटक तर एक फरार

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणारे रॅकेट उघडकीस आलंय. याप्रकरणी तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली असून तर एक जण फरार झाला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार – ४५ हा नकली नोटा चलनात आणणार असून त्यासाठी तो येणार असल्याचे समजले. ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली. यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगझाप, घनश्याम भोये, सुचितसिंग सोळुंके, राकेश पाटील,पवन परदेशी, मते, राठोड, सचिन करंजे यांचे पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला. पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा आढळल्या. यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता या गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये बनावट नोटा बनवल्याचे सांगितले.

यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे – ३२ यास नाशिक मधून अटक केली तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे – ५२ यास सिन्नर येथून सापळा रचून अटक केली. तर चौथा संशयित भानुदास वाघ हा फरार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon