घाटकोपर दुर्घटनाग्रस्त पेट्रोल पंपावर कोसळलेला फलक हटवटण्यासाठी वापरलेल्या गैस कटर मुळे आग
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई– घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त पेट्रोल पंपावर कोसळलेला फलक हटवटण्यासाठी मंगळवारी रात्री गॅस कटरच्या साह्याने काम सुरू करण्यात आले होते. रात्रभरात निम्म्यापेक्षा जास्त फलक कापण्यात आला असून बुधवारी सकाळी हे काम सुरू असताना अचानक आग लागली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाण्याचा मारा केल्याने ही आग तत्काळ आटोक्यात आली. घाटकोपरमधील महाकाय फलक कोसळल्यानंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याखाली अडकलेल्या अनेकांना बाहेर काढले. मात्र घटनेला चोवीस तास लोटल्यानंतरही दुर्घटनास्थलावरून फलक हटवता आला नव्हता. अखेर मंगळवारी रात्री गॅस कटरच्या साह्याने जवानांनी हा फलक कापण्यास सुरुवात केली. या फलकाच्या खालीच पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या असल्याने आग लागण्याची शक्यता होती. त्यामुळे खबरदारी म्हणून घटनास्थळी पाणी फवारण्यात येत होते. बुधवारी सकाळपर्यंत अर्ध्यापेक्षा अधिक फलक कापण्यात आला होता.
बुधवारी सकाळी वेल्डिंग मशीन आणि गॅस कटरच्या साह्याने फलक कापण्यात येत होता. याच वेळी दुर्घटनाग्रस्त वाहनांतून पडलेल्या पेट्रोलमुळे आग लागली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. आतापर्यंत घटनास्थळावरून १४ मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले आहे. मात्र आद्यपही काही मृतदेह फलकाखाली असून ते काढण्यासाठी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवान प्रयत्न करीत आहेत.