गांजा प्रकरणात अटक महिला पोलीस ठाण्यातून फरार; लोणीकंद पोलीस ठाण्यातील घटना
पोलीस महानगर नेटवर्क
वाघोली – गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेला दाखल गुन्ह्यात अटक केल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी कामात व्यस्त असताना नजर चुकवून तिने पोलीस लोणीकंद पोलीस ठाण्यातून धुम ठोकली. याबाबत पुन्हा तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील गायरान वस्ती येथे गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर २५ एप्रिल रोजी रात्री उशिरा लोणीकंद पोलीस ठाण्यातील पथकाने याठिकाणी छापा टाकून १ किलो ३२९ ग्रॅम गांजा जप्त केला. गांजा बाळगल्याप्रकरणी छकुली राहुल सुकळे (वय-२४ रा. वाघोली) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
रात्रीची वेळ असल्याने महिलेला अटक न करता तिला नोटीस देण्यात आली. २६ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेला अटक करुन याबाबत नोंद घेण्यात आली. तिला महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास महिला कर्मचारी सीसीटीएनएस कक्षामध्ये काम करत असताना छकुली सुकळे ही नजर चुकवून पळून गेली. आरोपी महिला पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तिचा पोलीस ठाण्याच्या आवारात व परिसरात शोध घेतला. परंतु ती सापडली नाही. यानंतर पळून गेल्या प्रकरणी छकुली सुकळे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.