बनावट शेअर ट्रेडिंग फसवणूक करणारी टोळी जेरबंद; सायबर पोलिसांची कारवाई
५ आरोपी अटकेत; १२० बँक खात्यातून ४ कोटींची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी चिंचवड – येथे सायबर शाखेकडून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट ट्रेडिंग अॅपच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात होती. अटक आरोपींकडून सात लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय सात मोबाइल फोन, पैसे मोजण्याची मशीन, आठ वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, १२ चेकबुक आणि पंजाब नॅशनल बँकेचे एक पासबुक जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील जुनैद मुक्तार कुरेशी, सलमान मंसूर शेख, अब्दुल अजीज अंसारी, आकिफ अनवर आरिफ अनवर खान आणि तोफीक गफ्फार अशी आरोपींची नावे आहेत. या पाचही जणांनी जवळजवळ १२० बँक खात्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची नागरिकांची फसवणूक केली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात एक बनावट शेअर मार्केट रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनेक नागरिकांनी या रॅकेटबद्दल तक्रार केली होती. तसेच, आरोपींनी दाखवलेल्या भरघोस परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली होती. ज्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. म्हणून नागरिकांनी पोलिसांकडे फसवणुकीच्या तक्रारीही दाखल केल्या होत्या. शहरातील नागरिकांनी केलेल्या या प्रकरणाशी संबंधीत विविध तक्रारींनुसार आतापर्यंत नागरिकांनी सर्व मिळून जवळपास ३१ लाख रुपयांहून अधिक रक्कम गमावली आहे.
एकाच शहरातील परिसरातून एकाच विषयावर प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपास सुरु केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला. फसव्या शेअर ट्रेडिंग ऍप्लिकेशनशी संबंधित पाच संशयितांना यशस्वीरित्या शोधून काढले आणि त्यांना पकडले. पोलिसांनी पुढे सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की पाचही आरोपींनी सुमारे १२० बँक खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची असंख्य व्यक्तींची फसवणूक केली आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील होते. कारण त्यांनी परदेशातील व्यक्तींकडून निधी प्राप्त केला. त्यांचे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर केले आणि ते त्यांच्या हाँगकाँग येथील हँडलरकडे हस्तांतरित केले. वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढे खुलासा केला की, आरोपी, जे बेरोजगार होते, त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींना टार्गेट केले. ते या व्यक्तींना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडायचे आणि परतावा देण्याचे आश्वासन देत गुंतवणूक करण्याची विनंती करायचे. मात्र, त्यांनी काही काळानंतर, आरोपींनी ठेवीदारांशी संवाद बंद केला आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला.