श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल
पक्षाचं नाव घेऊन युतीचं नाव खराब करण्याचं काम गणपत गायकवाड समर्थकांनी करु नये.
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या माध्यमांशी बोलताना त्यांच्या नावाची घोषणा केली. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी तरी फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितल्यानं त्यावर शिक्कामोर्तबच झालं आहे. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी थेट गणपत गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभेचा विषय पहिल्यापासूनच क्लिअर होता. माझं नाव एकनाथ शिंदेंनी बाकीच्या खासदारांसमोर जाहीर करण्यासाठी ठेवलं असेल. ऑलरेडी आम्ही युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठका झाल्या आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष लोकसभा प्रमुख, आमचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशी सर्वांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.
फडणवीसांनी माझी उमेदवारी जाहीर केल्यानं मी त्यांचं स्वागत करतो. यावेळी कल्याण लोकसभेतून मोठ्या मताधक्यानं ही जागा निवडून येईल. भाजपचे नेते गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदेंसाठी आपण काम करणार नाही, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडं पाठवला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, त्यामुळं त्यावर जास्त बोलणं योग्य नाही. पण ज्यांचा (गणपत गायकवाड) पर्सनल अजेंडा असेल तर तो त्यांनी वैयक्तिक राबवला पाहिजे पक्षाचं नाव घेऊ नाही. पक्षाचं नाव घेऊन युतीचं नाव खराब करण्याचं काम त्यांनी करु नये. गुंड प्रवृत्तीचे लोक असं वागत असतील तर ते योग्य नाही. हे असं का वागत आहेत? मतदारसंघाचा विकास केलेला नाही का? तर झालेला आहे. राज्य सरकार किंवा केंद्राचा अजेंडा हे खराब करत आहेत. त्यांच्या विधानाला गोळीबाराची पार्श्वभूमी आहे, त्यांनी स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केलेला आहे. निवडणुकीच्या काळात जर त्यांना यातून काही साध्य करायचं असेल तर ते त्यांनी विसरुन जावं, त्यांच्या चुकीचं समर्थन भाजपनंही केलेलं नाही. उलट युतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक जागेसाठी इथं युतीतील नेते तळमळीनं काम करत आहेत, असंही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.