काशिमीरामध्ये गांजा विक्रीसाठी आलेले दोघेजण पोलिसांच्या ताब्यात; लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा भाईंदर – काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार किलो वजनाचा गांजा व इतर साहित्य असे जवळपास १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजा विक्री करण्यास बंदी असताना बाहेरून येत गांजा विक्री करण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी गुजरात मधील सुरत येथील असून बॅगेत गांजा विक्रीसाठी घेऊन ते मिरारोड येथे आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्यावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय त्यांच्यावर अजून गुन्हे दाखल आहेत का? याबाबत पोलीस तपास करण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहेत. तसेच कोणालाही अशा प्रकारचे चुकीचे काम होत असल्याचे दिसल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा व त्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.