डोंबिवलीत पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, पत्नीवर संशयातून चाकू हल्ला
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – पती- पत्नीमध्ये सतत होणाऱ्या कौटुंबिक भांडणातून रविवारी रात्री संतप्त पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला करून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडी येथील एका सोसायटीत हा प्रकार घडला आहे. पती, पत्नी दोघेही मद्यपी आहेत. सुरेखा राजू हिवाळे (४७) असे गंभीर जखमी पत्नीचे नाव आहे. राजू शामुवेल हिवाळे (५३) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तो विक्रोळी येथील एका खासगी कंपनीत नोकतिला आहे. त्या दोघांना मद्य सेवन करण्याचे व्यसन आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी राजू हिवाळे यांचा मुलगा अनिकेत राजू हिवाळे यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील नांदिवली टेकडी येथील ग्रीन हेरिटेज सोसायटीमध्ये हिवाळे यांचे एकत्रित कुटुंब राहते. या कुटुंबात दोन भाऊ, त्यांची पत्नी, मुले, आई, वडील असा परिवार राहतो. प्रत्येक जण नोकरी, व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका करतात. पत्नी सुरेखा ही मद्य सेवन करून रात्री झोपली असता तिच्या पोटावर, हनुवटीवर, हातावर व अन्य शरीरावर वार चाकूने वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिकेत राजू हिवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं.| ५१५/२०२४ भा.द. वि. ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हाचा पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.पी.काळदाते हे करीत आहेत