जादा परताव्याचे आमिष दाखवून ठाण्यातील इसमाची लाखोंची ऑनलाईन फसवणूक ; पोलिसांत गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – राज्यात शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी जनजागृती करून देखील नागरिक खोट्या आमिषाला बळी पडून आपले आर्थिक नुकसान करून घेतात. ठिकठिकाणी जादा रक्कम मिळेल याचं आमिष दाखवून लुबाडणूक केली जात आहे. अशीच एक घटना ठाण्यातील नौपाडा परिसरात घडली आहे. नौपाडा मध्ये राहणाऱ्या एका महिलेला व्हाट्सअप मेसेज द्वारे सांगण्यात आले की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ३०० टक्के अधिक परतावा मिळेल. अधिक परताव्याच्या आमिषाला बळी पडून तब्बल २० लाख ५० हजार रुपये भरून शेअर्स ऑनलाईन खरेदी करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
विर सावरकर नगर, नौपाडा, ठाणे या परिसरात राहणाऱ्या (५५) महिलेला अनोळखी मोबाईलधारक इसमाने व्हाट्सअप मेसेज करून व्हाट्सएप ग्रुपमध्ये ऍड केले. त्यानंतर शेअरमार्केट मधून शेअर्स व आयपीओ खरेदी केल्यास ३०० टक्के असा भरघोस नफा मिळण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी महिलेस आरोपीने फाईन फॅब्रिक बँक व अरबन कलेक्शन बँक या खात्यात एकूण २०,५०,०००/- रु. रक्कम भरून शेअर्स ऑनलाईन खेरदी करण्यास सांगून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. सदर प्रकाराबाबत फिर्यादी महिला यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. || ३९८ /२०२४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क),६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करीत आहेत.