पाचगणीत डान्सबारवर ‘छमछम’ सुरू असतानाच सातारा पोलिसांनी छापा ;डॉक्टर, व्यापारी जाळ्यात…

Spread the love

पाचगणीत डान्सबारवर ‘छमछम’ सुरू असतानाच सातारा पोलिसांनी छापा ;डॉक्टर, व्यापारी जाळ्यात…

सातारा – पाचगणीतील खिंगर गावच्या हद्दीत टेन्ट हाऊस रिसॉर्टवर बारबाला नाचवल्याप्रकरणी टेन्टमालक, बारबालांसह खते बी-बियाणे विक्रेते व डिलर २५ जण अशा ३७ जणांवर सातारा पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विजय दिघे यांच्या मालकीचे पाचगणीत खिंगर गावच्या हद्दीत टेन्ट हाऊस असून, येथील एका हॉलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांना मिळाली. या माहितीवरून सातार्‍यावरून पोलिसांचे एक विशेष पथक पाचगणी खिंगरकडे रवाना करण्यात आले. पाचगणी खिंगर टेन्ट हाऊस रिसॉर्टवर बारबालांची ‘छमछम’ सुरू असतानाच सातारा पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी तेथे एका हॉलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील खत विक्रेते-डिलर बारबालांसमवेत डान्स करत असल्याचे पोलिसांना आढळले. सातारा पोलिसांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्या ठिकाणी ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलसह आलिशान कार जप्त करण्यात आल्या.

पाचगणी खिंगर येथील टेन्ट हाऊस रिसॉर्टवर ही मद्यधुंद रेव्हपार्टी सुरु होती. तळमजल्यावर विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या व डान्सबारसारखी बैठक व्यवस्थाही पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांना पाहताच काही बारबालांसह पाच ते सहाजण तेथून आलिशान वाहने सोडून तेथून पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी सोलापूर जिल्ह्यातील खत व्यावसायिक व खत कंपन्यांत काम करणारे काही एजंट व बारबाला मिळून एकूण ३७ जणांची सातारा पोलिसांनी चौकशी केली. अनेक जण दारूच्या नशेत नर्तिकांसमोर झिंगत असतानाच पोलिसांना रंगेहात सापडले. याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल उमेश रामचंद्र लोखंडे यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी १२ बारबाला व खत विक्रेते-डिलर तसेच पाचगणी टेन्ट हाऊसचे मालक डॉ. विजय दिघे तसेच मॅनेजरसह एकूण ३७ जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon