पुण्यात जादा परताव्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून ३.२५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिगंबर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत तुकाराम मोरे, नामदेव अंकुश गायकवाड, राजश्री रामचंद्र रस्ते, अनिल चव्हाण, रूपाली अनिल चव्हाण, शशिकला मारुती वादगावे आणि सुरेश गोरख कुंभार अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गायकवाड आणि रस्ते यांनी फिर्यादी दिगंबर गायकवाड यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला २० टक्के रक्कम परतावा देण्याचे भासवले. त्यानंतर मात्र फिर्यादीने केलेल्या गुंतवणुकीवर त्यांच्या बॅंक खात्यात ३ लाख २० हजार रुपये जमा केले. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे मित्र आणि नातेवाईक अशा एकूण २० जणांनी या कंपनीत दोन कोटी ८५ लाखांची गुंतवणूक केली. इतकंच नव्हे तर ४० लाख रोख स्वरूपात सुद्धा दिले. परंतु, त्यानंतर फर्यादींना कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले.